कोल्हापूर : दामदुपटीच्या आमिषाने कोटीची फसवणूक प्रकरणी जीएसटी अधिकार्यासह 5 जणांना अटक

गुंतवणुकीच्या रकमेवर सुरुवातीला दरमहा साडेचार टक्के व्याज, 12 महिन्यांनंतर 54 टक्के तसेच 24 महिन्यांनंतर मूळ रक्कम परत अशा फसव्या योजनेच्या सापळ्यात अडकलेल्या कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणार्या गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या म्होरक्यासह 9 जणांविरुद्ध मंगळवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कंपनीचा म्होरक्या आणि प्रमोटर असलेल्या जीएसटी अधिकार्यांसह पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
वार्षिक 54 टक्के व्याज आणि दोन वर्षांत मुद्दल परत देणार असे आमिष दाखवून म्होरक्यासह साथीदारांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. म्होरक्या इंद्रजित कदम व कंपनीचा प्रमोटर तथा जीएसटी अधिकारी कुमार उबाळे याने चौकशीत 30 ते 35 कोटींच्या फसवणुकीची कबुली दिली असली तरी सुमारे 300 ते 350 कोटींच्या आसपास ही रक्कम असावी, अशी शक्यताही तपास अधिकार्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
विजया दीपक कांबळे (रा. प्रताप भोसलेनगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) यांच्या फिर्यादीनुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही कारवाई केली. कंपनीचा म्होरक्या इंद्रजित सुभाष कदम (46, रा. प्रतिभानगर), प्रमोटर व जीएसटी अधिकारी कुमार जोतिराम उबाळे (52, राजेंद्रनगर), राहुल शशिकांत गाडवे (52, सातवी गल्ली, राजारामपुरी), अमरदीप बाबूराव कुंडले (49, राजगड कॉलनी, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर (47, मणेर मळा, उचगाव, करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयित अतुल वाघ (देवकर पाणंद), शैलेश वाघ (फुलेवाडी), शैलेश मरगज (शिवाजी पेठ), सुनीता आबासो वाडकर (मणेर मळा, उचगाव) अशी पसार झालेल्या अन्य संचालकांची नावे आहेत. संबंधितांना लवकरच अटक करण्यात यश येईल, असेही तपासाधिकारी कळमकर यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यातही फसवणुकीची व्याप्ती
कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह गोवा व कर्नाटकातही फसवणुकीची व्याप्ती असल्याचे कळमकर म्हणाले. प्राथमिक चौकशीत संशयितांनी 26 गुंतवणूकदारांची एक कोटी 11 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी कागदपत्रांसह संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.