मुरगुड : स्वातंत्र्य सैनिकांना तुकाराम चौक येथे दीप लावून अभिवादन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
13 डिसेंबर 1942 साली गारगोटी येथील कचेरीवर स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हुतात्मे झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मुरगुड येथील तुकाराम चौक येथे दीप लावून अभिवादन करण्यात आले.
1942 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये मुरगुड, कापशी, सांगाव इ. गावातील स्वातंत्र्यसैनिकांनी गारगोटी येथील कचेरीवर तेथे असणाऱ्या जुलून जबरदस्तीने गोळा करण्यात आलेल्या कराची रक्कम घेऊन ती स्वातंत्र्य कार्यासाठी वापरणे तसेच राजबंदी यांना सोडवणे या उद्देशाने हल्ला केला होता. यामध्ये सात जणांना हौताम्य प्राप्त झाले होते. या सात वीरांमध्ये मुरगुडचे तरुण हुतात्मा तुकाराम भारमल यांचाही समावेश होता. या वीरांना दरवर्षी मुरगूड शहरासह कापशी, गारगोटी इ. ठिकाणी अभिवादन करण्यात येते.
याचाच एक भाग म्हणून आदल्या दिवशी दीप लावून या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. प्रत्येक दारामध्ये सात दिवे लावून तसेच येथील हुतात्मा तुकाराम चौक येथील चौकामध्ये दीप लावून नागरिक स्वातंत्र्यसैनिक वारस हे हुतात्म्यांना अभिवादन करत असतात. यावर्षीही मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना डी डी चौगुले म्हणाले, संविधान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करण्यास तयार आहोत.
13 डिसेंबर रोजी सकाळी गारगोटी वरून क्रांतीज्योत आल्यानंतर हुतात्मा स्मारक मुरगूड येथे हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या स्मृतीस अभिवादन करून हुतात्मा तुकाराम चौक येथे कार्यक्रम होईल. या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येईल. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुरगुडकर यांनी हुतात्मा तुकाराम चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमाचे नियोजन समाजवादी प्रबोधिनी मुरगुड यांनी केले होते.
यावेळी मुरगूडचे ए.पी.आय दीपक भांडवलकर, दलितमित्र डी डी चौगुले, बबन बारदेस्कर, विलास भारमल, हेमंत पोतदार, विश्वनाथ शिंदे, संदीप भारमल, आनंदा गोधडे, अरुण धर्माधिकारी, सुभाष अनावकर, जयवंत हावळ, धनाजी गोधडे, वसंत निकम, राणोजी गोधडे, बजरंग सोनुले, बाळासाहेब सूर्यवंशी, विनायक हावळ, पी. आर. पाटील, पी. एस. दरेकर, महादेव सुतार, दत्ता मंडलिक, संतोष भोसले, सिकंदर जमादार, भिकाजी कांबळे आदी उपस्थित होते.