किणी टोलनाक्यानजीक ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार

ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला. पुणे – बंगळूर महामार्गावरील किणी टोलनाक्यानजीक सकाळी ९.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातात काशिनाथ नाना बादरे (वय.३८) यांचा मृत्यू झाला असून महेश मानसिंग बादरे (वय.२६. दोघेही रा . पोकर्णीणी ता . वाळवा) हे जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे – बंगळूर महामार्गावरुन बादरे कुटुंबातील काशिनाथ बादरे व महेश बादरे हे चुलते- पुतणे कोल्हापूरच्या दिशेने चालले होते. ते किणी टोल नाक्यानजीक आले असता पाठीमागून आलेल्या ट्रकने (टी. एन. २९ बी. व्ही. ८४००) जोराची धडक दिली. त्यानंतर काशिनाथ बादरे यांच्या शरीरावरुन ट्रकचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले तर महेश बादरे बाजूला पडल्याने ते जखमी झाले. ट्रक चालक एम. गोविंद स्वामी धर्मपुरी (मावरम,जि. फेनागरम राज्य तामिळनाडू) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मुंढे करीत आहेत.