‘ बिद्री ‘ : चिन्ह वाटप जाहीर झाल्याने प्रचाराच्या तोफा धडाडणार

बिद्री / प्रतिनिधी अक्षय घोडके :
येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दुरंगी लढत होत असून आज चिन्ह वाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला विमान तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला कपबशी हे चिन्ह दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली. याशिवाय विविध गटांतून उतरलेल्या सहा अपक्षांनाही चिन्ह मिळाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे.
कारखान्यासाठी येत्या ३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी २५ आणि सहा अपक्ष असे मिळून ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजीत घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे व भाजपचे नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
अपक्ष उमेदवार आणि त्यांना मिळालेली चिन्हे अशी :
रामचंद्र दत्तात्रय पाटील ( टेबल ), अजित बाबुराव पोवार ( शिट्टी ), बाळासाहेब मल्हारी पाटील ( शिट्टी ), रेखा महेशकुमार पाटील ( रिक्षा ), चंद्रकांत विष्णू जाधव-परीट ( छत्री ), दत्तात्रय पांडूरंग गिरी ( किटली ).