बिद्रीच्या रणसंग्रामात भाजपचा मोठा गट फोडण्यात मंत्री मुश्रीफ व के. पी. यशस्वी ; सत्तारुढ गटाला मिळाले बळ

कोल्हापूर प्रतिनिधी :
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर सत्ता संघर्षाच्या आघाडीत मंत्री मुश्रीफ व के.पी पाटील यांनी भाजपचा मोठा गट आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे. भाजपचे नेते व शाहूचे चेअरमन समरजीतसिंह घाटगे यांनी खा.संजय मंडलिक,आ. प्रकाश आबिटकर यांना घेऊन बिद्रीत श्री राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी स्थापन करून सत्ताधारी आघाडी समोर तगडे पॅनेल उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातच कागल तालुक्यातील एक गठ्ठा मतदान असणारे नेते सुनीलराज सूर्यवंशी -निढोरीकर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांना सत्तारूढ आघाडीकडे खेचण्यात मंत्री हसन मुश्रीफ, के.पी.पाटील यांना यश मिळाले आहे.
बिद्रीच्या सत्तेत भाजपचे महत्त्व अनन्यसाधारण असले तरी कागल व भुदरगड मधून दोन युवक नेते की, ज्यांच्याकडे एक गठ्ठा मतदान आहे, अशा नेत्यांनी सत्तारुढ आघाडीला दिलेले पाठबळ शाहूचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना धक्का देणारे ठरले आहे. यामुळे या दोन तालुक्यात विरोधी आघाडीला भाजपची कशी साथ लाभणार हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.