धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचार्याला वाहन चोरी प्रकरणी अटक, 8 दुचाकी जप्त, प्रचंड खळबळ

पुरंदर तालुक्यातील निरा येथील पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी जेजुरी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दुचाकी चोरास अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता पोलिसांना धक्का बसला. दुचाकी चोरणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर चक्क पोलीस कर्मचारीच निघाला. त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. तर त्याच्याकडून दुचाकी विकत घेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
विनोद मारुती नामदार (रा. वाणेवाडी, ता. बारामती) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर चोरीच्या दुचाकी खरेदी केल्याप्रकरणी अस्लम मुलाणी (रा. निरा, ता. पुरंदर) आणि पृथ्वीराज ठोंबरे (रा. मुरुम, ता. बारामती ) यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विनोद नामदार हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात कार्यरत असल्याची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील निरा हद्दीमध्ये काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दुचाकी चोरीप्रकरणी तांत्रिक तपास व खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोद नामदार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
नामदार हा गावी आल्यानंतर दुचाकी चोरी करत होता. त्यानंतर चोरलेल्या दुचाकी वेगवगेळ्या गावात लोकांना विकत होता.यातील काही दुचाकी खरेदी करणाऱ्या मुलाणी व ठोंबरे यांना पोलिसांनी अटक केली.त्या दोघांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. तर विनोद नामदार याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.