कोल्हापूर : फुलेवाडीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून तर खासबाग मैदानाजवळ वृद्धाची हत्या ; दोन खुनाने कोल्हापूर हादरले

सोमवारी रात्री गजबजलेल्या फुलेवाडीतील धाब्याजवळ पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय 30, रा. दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) याचा अमानुषपणे खून करण्यात आला. रात्री 8.30 वाजता ही घटना घडली; तर अवघ्या तासात खासबाग मैदानाजवळ काठीने डोक्यात प्रहार करून सतीश बाबुराव खोत (वय 58, रा. बालगोपाल तालमीजवळ) या वृद्धाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला.
फुलेवाडी आणि खासबाग मैदानाजवळ घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे पोलिस यंत्रणा कमालीची हादरली आहे. दोन्हीही घटनास्थळासह शासकीय रुग्णालयाच्या आवारात कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. ऋषीकेश नलवडे याचे कुटुंबीय तसेच त्याच्या समर्थकांनी आक्रोश केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने पाचारण करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत तणावाची स्थिती होती.