कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरीत सर्व दिव्यांगांना सीएसआर मधून साहित्य वाटप करणार – पालकमंत्री, हसन मुश्रीफ

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील ज्या दिव्यांगांना अद्याप साहित्य मिळाले नाही अशा 45 हजार दिव्यांगांपैकी उर्वरित व्यक्तींना सीएसआर मधून आवश्यक साहित्य वाटप देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच समिती मधील सदस्यांमार्फत वैश्विक ओळखपत्र UDID न मिळालेले काही दिव्यांग असल्याची माहिती दिली.
याबाबत जिल्हाशल्यचकित कार्यालयाकडून दिव्यांग ओळखपत्र आवश्यक असते. ते काढण्यासाठी तालुकास्तरावरून सर्व दिव्यांगांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्याबाबत ही त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निर्देश दिले.
यानंतर सर्व गरजू दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र देण्यात येणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठी विमा योजनेबाबत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केंद्र शासनाच्या योजनेतील विमा योजना 485 रुपये व 12 रुपये चा विमा काढल्यास कमी पैशात जास्त परतावा असलेल्या योजनेचा लाभ मिळेल असे सांगितले. दिवंग्यांच्या अडीअडचणी संदर्भात सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी व दोन्ही महानगरपालिकांचे आयुक्त यांच्यासोबतची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे.
या बैठकीला आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ.प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.