दूध उत्पादक, दूध संस्था यांच्या अडचणीसाठी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी मनसेची बैठक

दूध उत्पादक, दूध संस्था यांच्या अडचणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार दि. २७/१०/२०२३ रोजी सकाळी १२ वाजता गडहिंग्लज येथील शासकीय विश्रागृह गडहिंग्लज येथे उपविभागातील सर्व दुध संस्था चालक सचिव यांची बैठक आयोजित केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणजे गोकुळ दूध संघ. त्यातूनच आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या अशी एक म्हण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचलित झाली. तेथील मलईसाठी राजकीय नेत्यांचा अट्टाहास सर्वच निवडणुकांमधून समोर येतो. मात्र स्वतः शेण-मूत्रात राहून गोकुळला ज्यांनी शिखरावर नेले असे दुध उत्पादक सभासद अन गोकुळवर निष्ठा ठेवून वर्षानुवर्षे सोबत राहिलेल्या पुण्या-मुंबईतील ग्राहकांचा कुठेच विचार होताना दिसत नाही.
इतक कमी होत की काय म्हणून आत्ता दुध उत्पादक सभासद आणि संघ यांच्यामधील दुवा असणाऱ्या गावोगावच्या दुध संस्थाचीही आर्थिक पिळवणूक गोकुळच्या कारभाऱ्यांकडून सुरु झाली आहे. गाईच्या दूध दरात जी कपात केली ती पुर्वरत झालीच पाहिजे या अनुषंगाने आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी म्हणून याच्या मुळापर्यंत जाऊन या संस्थांना भक्कम पाठबळ द्यायचे ठरविले आहे.
आमच्या पाहणीनुसार दुध संस्थांना पुढील अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून याबाबत व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे.
• दुध संस्थांनी संकलित केले दुध संघाच्या विविध चिलिंग सेंटरवर घेत असताना फॅट आणि एसएनएफ नुसार प्रतवारी ठरवली जाते व त्यानुसार बिल अदा केले जाते. मात्र बहुतांश संस्थेच्या दुधाची प्रत दहा दिवसाच्या काळात अमुलाग्ररित्या बदलेली दिसते. एक दिवस उत्तम प्रतीचे ठरलेले दुध दुसऱ्या दिवशी सामान्य प्रतीचे ठरते तर अचानक कधी दुय्यम प्रतीचे ठरवून रिजेक्ट केले जाते. गायीचे दुध तर दहा दिवसात किमान ३ ते ४ वेळा रिजेक्ट केले जाते.
• रिजेक्ट केलेल्या दुधाला केवळ चार ते पाच रुपये दर संस्थाना दिला जातो. पण या रिजेक्ट केलेल्या दुधाचे गोकुळ संघ नेमका काय करतो?
• संस्थेचे दुध घालणारे सभासद रोजचे तेच असताना, संस्थेकडे सभासदांच्या दुधाचे फॅट आणि एसएनएफ नेहमीप्रमाणेच असताना आणि संस्थेच्या एकत्रीत दुधाचे फॅट आणि एसएनएफ स्थिर असताना मग नेमका संघात पाठवलेल्या दुधाची प्रत अचानक कशी बदलते?
• पूर्वी संस्थेला दर शंभर लिटरच्या मागे तीन ते चार लिटर दुध वाढ मिळत होती, आता वाढ तर बाजूलाच पण घट मात्र वाढत आहे. याचे गौडबंगाल काय?
• पूर्वी दुधाची प्रत असो अथवा घट याबाबत संस्थेने संघास पत्र पाठवल्यास दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी संघाकडून सुपरवायझर पाठवला जायचा, दुरस्ती व्हायची. आत्ता कितीही पत्रे पाठवली तरी त्याला केराची टोपली दाखवली जाते का?
• पशुवैद्यकीय सेवा आणि पशुखाद्य दोन्हीही दोन्हींचा दर्जा राहिलेला नाही. उत्तम दर्जाच्या दुधाला दुय्यम ठरवणारे कारभारी याचा दर्जा सुधारणार आहेत का?
• पूर्वी दर दहा दिवसांनी नित्यनेमाने जमा होणारे संस्थांचे बिल आज बेभरवशाचे होण्याचे कारण काय?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संस्थाचालकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार वार दिनांक २७/१०/२०२३ रोजी सकाळी १२ वाजता गडहिंग्लज येथील शासकीय विश्रागृह गडहिंग्लज येथे उपविभागातील सर्व दुध संस्था चालक सचिव यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत संस्थांसमोरील सर्व अडचणीवर सविस्तर चर्चा करू आणि गोकुळच्या कारभाऱ्याना वठणीवर आणता येईल अशी आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. या कारभाऱ्याना वठणीवर आणून संस्थाचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटीबद्ध असून यासाठी कोणत्याही प्रकारच्या खळखट्याक आंदोलनास नेहमीच तयार असणार आहे. त्यामुळे सर्व संस्थाचालक आणि सचिवांनी या बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.