ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प सुरुवातीला ३० हजार लिटर क्षमतेचा होता. वाढवून तो ५० हजार लिटर क्षमतेचा केला. सध्या एक लाख लिटर क्षमता आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील हंगामात नऊ हजार टन क्षमतेने गाळप करण्याचा मानस आहे. गेल्या गळीत हंगामात सततच्या ढगाळ वातावरणामुळे ऊसपिकाच्या वाढीवर दुष्परिणाम झाला. या गळीत हंगामात ऊस उत्पादनावर कमी पर्जन्यमानाचा फटका बसणार आहे. त्यामुळे हा गळीत हंगाम फेब्रुवारीअखेर चालेल की नाही याबद्दल सबंध महाराष्ट्रातीलच शेती अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. सातत्याने कमी होत चाललेला गळीत हंगामाचा कालावधी ही साखर कारखानदारीसह शेतकरी, कामगार आणि सर्वांच्याचदृष्टीने चिंताजनक बाब आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपसाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

स्वागत डिस्टिलरी व्यवस्थापक संतोष मोरबाळे यांनी केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार ऊसविकास अधिकारी उत्तम परीट यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks