जालन्यातील कोतवाल भरतीचा पेपर फुटला ; ५ संशयित ताब्यात

जालना येथे आज कोतवाल भरती साठीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पेपर सुरू झाल्यानंतर ब्लूटूथच्या सहाय्याने पेपर बाहेर असणाऱ्या साथीदारांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार जालना शहरातील परीक्षा केंद्रात उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ५००० परीक्षार्थी १९ परीक्षा केंद्रावर परीक्षेला बसले होते. या प्रकरणी गैरप्रकार करणारे ४ जन परीक्षा केंद्रात तर १ जन परीक्षा केंद्राबाहेर होता. हा प्रकार लक्षात आल्यावर या ५ जणांना पकडले आहे. कोतवाल भरती परीक्षेत आज आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून झालेल्या गैरप्रकाराच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आज कोतवाल भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत गैरप्रकार करताना ५ उमेदवार आढळून आले आहेत. त्यांच्याकडे त्यांनी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून परीक्षेत कॉपी करण्याचा प्रकार निदर्शनास आला होता. तर जालना शहरातील राष्ट्रमता इंदिरा गांधी महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणावरून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कॉपी करण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात महसूल विभागातर्फे तक्रार दाखल करण्यात असली असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.
दरम्यान या प्रकारामुळे परीक्षार्थी मध्ये एकच खळबळ उडाली असून आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या परीक्षेसाठी विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने परीक्षेला सामोरे जात होते पण या प्रकारामुळे किती परीक्षार्थी या प्रकरणात गुंतले आहेत. किती जणांपर्यंत हा पेपर पोहचले या तपासाचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. अजून किती मासे या गळात अडकणार हे लवकरच उघड होईल. पोलिसांनी ५ जणांच्या मुसक्या आवळल्या असून महसूल पोलीस यंत्रणा अधिक तपास करीत असणार तरी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचा सुरक्षिततेचा व गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आल्याने विद्यार्थी देखील गोंधळून गेले आहेत.