पन्हाळा : सिध्दकला हायस्कूल मल्हारपेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथील सिध्दकला हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन व परिसरात प्रभातफेरी काढत तसेच स्वच्छता अभियान राबवत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा- स्वच्छता ही सेवा 2023 या उपक्रमाच्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे. जुन्या इमारतींचे जीर्णोद्धार, जलकुंभ, घाट, भिंती रंगविणे, नुक्कडनाटके स्पर्धा आयोजित करणे अशा विविध स्वच्छता उपक्रमात नागरिक सहभागी होत आहेत. हा पंधरवडा सुरू झाल्यापासून, या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमात आतापर्यंत 5 कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत.
सिध्दकला हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सकाळी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मल्हारपेठ,सावर्डे,मोरेवाडी गावांतील गल्लींमध्ये प्रभातफेरी काढली.
यामध्ये विद्यार्थ्यांकडून महात्मा गांधी की जय , जय जवान जय किसान,शिक्षणविषयक घोषणा,पर्यावरणविषयक घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर शालेय परिसरासह सावर्डे येथील जोतिबा मंदिर, मोरेवाडी येथील दत्त मंदिर,स्मशान शेड परिसर,मल्हारपेठ ते मोरेवाडी रस्ता, गटारी विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा केली होती.प्रभातफेरीची सांगता मोरेवाडी येथील दत्त मंदिर प्रांगणात वंदे मातरम् गीताने करण्यात आली .
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव परितकर, मुख्याध्यापक एस.व्ही पाटील , शिक्षक के.एच पाटील,पी.पी जाधव,पी.बी टिक्के,एम.एम आळवेकर,यु.यु गुरव,पी.बी सुतार,यासह विठ्ठल रसाळ, कुमार रसाळ, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.पी जाधव यांनी केले तर आभार के.एच पाटील यांनी मानले.सिध्दकला हायस्कूलच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.