ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी मुंबई, पुण्यात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीवरही पावसाचे सावट आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम तेलंगणावर हवेच्या वरच्या थरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.

छत्तीसगडपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. या पोषक स्थितीचा परिणाम म्हणून राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यात गुरुवारी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह एक-दोन जोरदार सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबईत पावसाच्या सरी….

गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी मुंबई शहर तसेच उपनगरांत हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह ठाणे, पालघर भागांत पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सांताक्रुझ केंद्रात २२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकणात जोर वाढणार….
पुढील दोन दिवस किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज, गुरुवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अ‍ॅलर्ट दिला असून, मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही जिल्हेवगळता संपूर्ण राज्याला यलो अ‍ॅलर्ट दिला असून, हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks