ठाकरे गट आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी 25 सप्टेंबरला, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर घेणार सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले होते. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यानंतर राहुल नार्वेकर गुरुवारी (दि.21) दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करुन पुढची रणनीती ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी घेणार आहेत. त्यामुळे येत्या सोमवारच्या सुनावणीत काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या समोर 14 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी एक आठवड्याचा वेळ दिला होता. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने नार्वेकर यांना सुनावले. या प्रकरणात वेळकाढूपणा का करताय असे खडे बोल सुनावले होते. तसेच या प्रकरणात केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून काम करायचे आहे याची आठवण सुप्रीम कोर्टाने करुन दिली. यानंतर नार्वेकर यांनी काल तातडीने दिल्ली गाठली आणि सल्लामसलत करुन पुढची रणनीती ठरवली आणि पुढच्या सुनावणीची तारीख ठरवली आहे.
आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्देश देताना यावर पुढच्या दोन सुनावणीपूर्वी नेमकी काय कारवाई केली याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी द्यावी. अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करु शकत नाही, किती वेळ काम करणार याचे टाईम टेबल अध्यक्षांनी द्यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. आता त्यानंतर सोमवारी (दि.25) सुनावणी होताना टाईम टेबल विधानसभा अध्यक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेप्रकरणी 3 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सुनावणीत राहुल नार्वेकर यांनी केलेल्या कामाचा आरखडा द्यावा लागणार आहे.