ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगूडात प्रारंभ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगुडातील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मध्ये सुरुवात झाली. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील विजेत्या मल्लांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांच्या हस्ते संस्थेच्या संचालिका आशालता भोसले, शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने, गर्ल्सच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मंडलिक आखाड्याची मल्ल स्वाती शिंदे हिचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्पर्धा दोन दिवस चालणार असून या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश खोत, दादा लवटे, के. बी. चौगुले, बाळासाहेब मेटकर, रवींद्र पाटील, अक्षय डेळेकर, दयानंद खतकर, सागर देसाई हे काम पाहणार आहेत.

स्वागत व प्रास्ताविक शिवराज हायस्कूलचे उपमुख्याध्यापक प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. दिवंगत माजी नगराध्यक्ष व वस्ताद पांडुरंग भाट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्घाटनपर भाषणात गजाननराव गंगापुरे यांनी कुस्तीतील मुलींचे वर्चस्व विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगून दिवंगत लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून कुस्तीला ऊर्जितावस्था प्राप्त झाल्याचे कृतज्ञ उद्गार काढले. प्राचार्य माने यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. आभार तालुका क्रीडा समन्वयक एकनाथ आरडे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks