ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस उत्पादन वाढले तर साखर कारखानदारी यशस्वी होईल : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; उत्तुर येथे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामार्फत ऊस पिक परिसंवाद

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी कठोर परिश्रमासह नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. ऊस उत्पादन वाढले तरच साखर कारखानदारी यशस्वी होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आंबेओहळ प्रकल्पाचे पाणी वापरून एकरी १०० टन ऊस उत्पादन काढण्याची शपथ घ्या. त्यामुळे येणाऱ्या आर्थिक सुबत्तेतून शेतकरी कुटुंबांचे जीवनमानही उंचावेल, असेही ते म्हणाले.

उत्तुर ता. आजरा येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे होते.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पाणी बचत ही काळाची गरज आहे. ठिबकसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून समप्रमाणात पाणी व समप्रमाणात खते मिळाल्यास पिकाची एकसारखी वाढ होऊन आपोआपच उत्पन्न वाढेल. साखर कारखान्यांचा हंगाम अलीकडे तीन -साडेतीन महिन्यांवर येत आहे. ऊस पिक वाढल्यास तो वाढेल.

“ऊस पिकासाठी पाण्याचे सुयोग्य नियोजन – खत व्यवस्थापन व ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर” या विषयावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ तथा नेटाफिम इंडिया प्रा. लि. चे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. अरुण देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याचबरोबर एकरी १०० टन ऊस उत्पादन वाढीची पंचसूत्री देखील शेतकऱ्यांना शिकवली.

कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य काशिनाथ तेली, आजरा कारखाना संचालक मारुतीराव घोरपडे, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती दीपक देसाई, माजी उपसभापती शिरीष देसाई, आजरा तालुका खरेदी विक्री संघ संचालक महादेव पाटील, नेटाफिम इरिगेशन प्रा. लि. चे राजकुमार माळी, प्रशांत पाटील, विशाल आगळे आदी मान्यवर तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत ऊस विकास अधिकारी उत्तम परीट यांनी केले. प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे यांनी केले. आभार प्रमोद तारेकर यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks