आदमापूर : बाळूमामा पुण्यतिथी उत्सव पूजेबाबत आदेश , भोसले कुटुंबियातील महिलांना पुजेचा मान , उच्च न्यायालयाचा निकाल

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा पुण्यतिथी उत्सवाच्या पूजेचा मान येथीलच भोसले कुटुंबातील महिलांना मिळाला आहे. हौसाबाई शिवाजीराव भोसले व राजनंदिनी धैर्यशील भोसले यांना हा मान दिला असून याबाबतचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
बाळूमामा देवस्थान मधील विश्वस्त मंडळ निलंबन करण्यात आले असून प्रशासक म्हणून धर्मादाय सह आयुक्त शिवराज नाईकवडे हे कामकाज पाहत आहेत. बाळूमामा देवालय समितीच्या घटनेमध्ये बाळूमामाचे सण उत्सवाच्या वेळी घोंगडे, काठी ,भंडारा ,अभिषेक, पालखी सोहळा प्रसंगी पुजा करण्याचा मान हा धैर्यशील भोसले यांना देण्यात आला आहे. त्याना हा मान त हयात वंशपरंपरागत देण्यात आल्याची नोंद आहे.
पण सध्या येथील विश्वस्त मंडळच निलंबित असल्याने धैर्यशील भोसले यांनी उच्च न्यायालयात या माना संदर्भात दाद मागितली होती. त्यावर नुकतीच सुनावणी झाली व भोसले यांना हा मान मिळाला धैर्यशील भोसले हे स्थापनेपासून या मंडळाचे मानद अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. पण देवस्थान समितीच निलंबन झाल्यामुळे धार्मिक कार्य कुणी करायचे हा पेच प्रसंग निर्माण झाला होता.
मानद अध्यक्ष भोसले यांना हा मान मिळावा म्हणून अँड .विनीत नाईक यांनी युक्तिवाद केला. विरोधी वकील बांदिवडेकर व वकील प्रशांत भावके यांनी आक्षेप घेतला. या आक्षेप मध्ये एकीकडे मानद अध्यक्ष म्हणून भोसले मान मागतात तर दुसरीकडे कार्याध्यक्ष म्हणून काम करू पाहतात. त्यांचा आर्थिक बाबींशी संबंध आला आहे असे म्हणणे मांडले. यावर उच्च न्यायालयाने धैर्यशील भोसले यांची आई हौसाबाई भोसले व त्यांची पत्नी राजनंदिनी भोसले यांना या सर्व पूजा करण्याचा मान दिला आहे. भोसले यांचा मुलगा अज्ञान असल्यामुळे त्यांना हा मान देण्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील महिलांना देण्यात आलेला आहे.
बाळूमामांचा पुण्यतिथी उत्सव 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अखेर संपन्न होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये अभिषेक, विना पूजन,पालखी सोहळा प्रसंगी पुजा करण्याचा मान 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अखेर जे महत्वाचे कार्यक्रम आहेत ते भोसले कुटुंबियांना करावे लागणार आहेत यासाठी भोसले कुटुंबीयांना पोलीस बंदोबस्त द्यावा असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
पुजेचा मान हा घटनेनुसार भोसले कुटुंबीयांना आहे.न्यायालयाने ते स्पष्ट केले आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
– शिवराज नाईकवडे
प्रशासकीय अध्यक्ष बाळुमामा मंदिर