शेंडा पार्कमधील अकराशे बेडच्या हॉस्पिटलचे काम तीन महिन्यात सुरू करू :मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कागलमध्ये आयुष्मान भारतच्या “आपला दवाखाना” चे लोकार्पण

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे दवाखाने येतात. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दवाखाना कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये होणार आहे. ९०० कोटीहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पाचे काम तीन महिन्यात सुरू करू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ६०० बेडचे सामान्य रुग्णालय, कॅन्सर उपचारांचे २५० बेडचे हॉस्पिटल व सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे २५० बेड, असे एकूण ११०० बेडचे सर्व सोयीनीयुक्त सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल होईल,असेही ते म्हणाले.
कागलमधील वड्डवाडी, गोसावी वसाहत, कुरणे झोपडपट्टी या वसाहतींसाठी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत “आपला दवाखाना” च्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
भाषणात मंत्री श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या ३५ ते ४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मनापासून वैद्यकीय सेवा केली. माझ्याकडे आलेल्या एकाही रुग्णाची उपचाराविना परवड झाली, असे एकही उदाहरण दाखविता येणार नाही.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मोठ्या तळमळीने ही योजना कागलपर्यंत आणलेली आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून जनतेला मोफत उपचार व औषधेही मिळणार आहेत.
नगरसेवक सतीश घाडगे म्हणाले, गोरगरिबांच्या कल्याणाची कोणतीही योजना असू दे. ती जनतेपर्यंत आणण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ हे नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. या परिसरातील वड्ड आणि गोसावी समाजातील नागरिकांच्या पाठीशी नामदार श्री. मुश्रीफसाहेब हे नेहमीच पहाडासारखे उभे राहिले.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, कोल्हापूर जिल्हा कुटुंब नियोजन प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डाॅ. योगेश साळी, डॉ. संजय रणवीर, डॉ. योगेश कदम, डॉ. फारूक देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, शोभा श्रीवास्तव, भरत सोनटक्के, कृष्णात शिंदे, संदीप भुरले, सुनील माळी, शशिकांत नाईक, अर्जुन नाईक, सागर गुरव, चंदू कांबळे, महेश गाडेकर, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचीही सत्कार झाले. तसेच, ७०० कुटुंबीयांना धान्यवाटपही झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी केले. आभार सुनील माळी यांनी मानले.