मंडलिक महाविद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्षणचित्रांचे पोस्टर प्रदर्शन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण देश ‘आजादी का अमृतमहोत्सव’ साजरा करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागांतर्गत ९ ऑगस्ट ‘क्रांतीदिनाचे’ औचित्य साधून ‘भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्षणचित्रांचे पोस्टर प्रदर्शन ‘ करण्यात आले.
सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुशांत पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो.डॉ. टी.एम. पाटील यांच्या हस्ते पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “यावर्षी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आपणास ज्ञात असणे गरजेचे आहे.
हाच इतिहास या पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी झाशीच्या राणीपासून ते सिमला करारापर्यंत अनेक क्षणचित्रांचा समावेश यामध्ये केलेला आहे. हा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण आपली पुढील वाटचाल केली पाहिजे आणि भारताला एक जागतिक महासत्ता बनवण्यासाठी झटले पाहिजे” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचा समारोप करताना प्रा. डी.व्ही. गोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी आर्ट्स फॅकल्टी हेड प्रा. पांडुरंग सारंग, कॉमर्स फॅकल्टी हेड प्रा.डाॅ.एम.ए.कोळी, प्रा.डॉ.एस.बी.पोवार, प्रा.डॉ.एच.एम.सोहनी, प्रा. गुरुनाथ सामंत, प्रा. रामचंद्र पाटील, प्रा. प्रशांत कुचेकर तसेच प्रशासकीय सेवक व बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.