स्व. पांडुरंग हरी पाटील यांनी प्रतिकूल काळात श्री. महालक्ष्मी शिक्षण संकुल उभारले : नामदार हसन मुश्रीफ ; सावर्डे बुद्रुकमध्ये श्री. महालक्ष्मी गर्ल्स हायस्कूलचे स्व. पांडुरंग हरी पाटील माध्यमिक विद्यालय असे नामकरण

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथे स्वर्गीय पांडुरंग हरी पाटील यांनी १९६८ साली विकास शिक्षण मंडळ स्थापन करून शैक्षणिक क्रांती केली, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी काढले. त्या प्रतिकूल काळातही श्री. महालक्ष्मी शिक्षण संकुलाच्या रूपाने या पंचक्रोशीत ज्ञानगंगा आली, असेही ते म्हणाले.
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील श्री महालक्ष्मी गर्ल्स हायस्कूल या कन्याशाळेचे स्व. पांडुरंग हरी पाटील माध्यमिक विद्यालय असे नामकरण नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डाॅ. इंद्रजीत पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा विकास शिक्षण मंडळाच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, श्री. महालक्ष्मी शिक्षण संकुलाला लागेल ते सहकार्य करू. या शाळेच्या खोल्या जीर्ण झालेल्या आहेत, त्या नवीन बांधकामासाठी प्रयत्न करू. तसेच; शाळेला दहा संगणक आणि स्कूलबस देण्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली.
व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, सदासाखरच्या संचालिका सौ. राजश्री चौगुले, पिराचीवाडीचे सरपंच सुभाष भोसले, पी. डी. हिरूगडे, सोनारवाडीचे सरपंच ऋषिकेश पाटील, विकास शिक्षण मंडळाचे संचालक दत्तकुमार पाटील, माजी सरपंच शंकरराव जाधव, सखाराम पाटील, सुरेश शेवाळे, श्रीमती विद्याताई पाटील, आप्पासाहेब पाटील, संजय चिंदगे, आर. टी. पाटील, आर. एम. मेंगाने, आनंदा म्हातुगडे, वाय. जी. वाळवेकर, पांडुरंग काशीद, जितेंद्र हिरुगडे, विनोद कांबळे, पुष्कराज पाटील, विलास अस्वले, बी. एम. म्हातुगडे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत प्राचार्या सौ. प्रभाताई पाटील यांनी केले. प्रास्ताविक शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. टी. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी चव्हाण यांनी केले. आभार बाळासाहेब चिंदगे यांनी मानले.