दीड लाखांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेतीचे सेल सर्टिफिकेट पुतण्याच्या नावाने देण्यासाठी मनोरा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक, प्रस्तुतकार यांना दीड लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. अनंत किसन राठोड (वय-34) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.9) तक्रारदार यांच्या साखरडोह येथील घरी केली.
याबाबत मनोरा तालुक्यातील साखरडोह येथील 59 वर्षीय व्यक्तीने वाशिम एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे मालकीच्या शेतीचे सेल सर्टिफिकेट पुतण्याच्या नावाने देण्याकरिता अनंत राठोड याने दीड लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी वाशिम एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली होती. पथकाने 1 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता राठोड याने लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार हे पैसे देण्यास तयार होते. मात्र अनंत राठोड याला शंका आल्याने त्याने पैसे स्वीकारले नाहीत. एसीबीचे पथक हे मागील काही दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवून होते. आरोपी हा लाचेची रक्कम नेण्यासाठी घरी येत असल्याची माहिती तक्रारदार यांनी पथकाला दिली. बुधवारी कार्यालय बंद झाल्यावर आपल्या गावी जाताना आरोपी राठोड पैसे घेण्यासाठी तक्रारदार यांच्या घरी आले. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. अनंत राठोड याच्यावर मनोरा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप ,अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके , पोलीस निरीक्षक सुजित कांबळे,पोलीस अंमलदार विनोद मार्कंडे, नितीन टवलारकार, दुर्गादास जाधव, राहुल व्यवहारे, विनोद अवगळे,योगेश खोटे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख यांच्या पथकाने केली.