25 लाखांच्या व्यवहारावरुन ओला-उबेर चालकाचे अपहरण ; सांगलीहून सुटका, गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक

पूर्वीच्या २५ लाख रुपयांच्या व्यवहारावरुन कोंढवे धावडे येथून एका ओला उबेर चालकाचे जबरदस्तीने अपहरण करुन त्याला पळवून नेण्यात आले. खंडणी विरोधी पथकाने सांगली येथून या चालकाची सुटका केली असून ६ जणांना अटक केली आहे.
वैभव श्रीकृष्ण जाधव (वय २७, रा. स्वामी चैतन्य बिल्डिग, खडकवस्ती, कोंढवे धावडे) असे अपहरण केलेल्या ओला उबेर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी अक्षय मोहन पाटील (वय २८, रा. टंच सेंटर, नेपाळ, मुळ रा. घोटी खुर्द, ता. खानापूर, जि. सांगली), सुशांत मधुकर नलावडे (वय २८, रा. तळे वस्ती, ता. खानापूर, जि. सांगली), महेश मलिक नलावडे (वय २५), बोक्या ऊर्फ रंजित दिनकर भोसले (वय २६, रा. तासगाव, जि. सांगली), प्रदीप किसन चव्हाण (वय २६, रा. भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली) आणि अमोल उत्तम मोरे (वय ३२, रा. बिरंवडी, ता. तासगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पूनम वैभव जाधव (वय २६, रा. कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ८८/२३) दिली आहे. हा प्रकार कोंढवे धावडे येथील स्वामी चैतन्य बिल्डिंगमध्ये शनिवारी रात्री आठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव जाधव हे ओला उबेर चालक आहेत. अक्षय पाटील हा दिल्ली येथे सोन्या चांदीचा व्यवसाय करतो. २०२१ – २२ मध्ये वैभव जाधव हे अक्षय पाटीलकडे कामाला गेले होते. दिल्ली येथे त्यांच्यात २५ लाख रुपयांच्या व्यवहारावरुन वाद झाला होता. नंतर नोव्हेबर २०२२ मध्ये ते कामावरुन परत घोटी बुदु्क येथे आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील पैशांचा वाद मिटवला होता.
फिर्यादी पूनम या ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घरात असताना अक्षय पाटील हा दोघांना घेऊन घरात शिरला. त्यांनी वैभव कोठे आहे, असे सांगून त्यांना धमकावले. इतर दोघांनी आम्ही पोलीस असल्याचे त्यांना सांगून वैभवला बोलावण्यास सांगितले. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वैभव घरी आल्यावर त्यांनी मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये घालून पळवून नेले. उत्तमनगर पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली होती.
खंडणी विरोधी पथकाच्या दोन्ही युनिटने या अपहरणकर्त्यांचा माग काढून सांगलीमधून वैभव जाधव याची सुटका केली.६ अपहरणकर्त्यांना अटक केली असून पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे , पोलीस निरीक्षक किरण बालवडकर , पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई ,
सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील , सहायक पोलीस निरीक्षक रोकडे ,पोलिस अंमलदार रवींद्र फुलपगारे, किरण देशमुख, किरण ठवरे, उज्वल मोकाशी, राजेंद्र लांडगे, ज्ञानेश्वर तोडकर यांनी केली आहे.