शेणगांव येथील दत्तमंदीराच्या विकास कामांकरीता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रसिध्दीपत्रकाव्दारे माहिती; पहिल्या टप्यात 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र असलेल्या शेणगांव (ता.भुदरगड) येथील श्री दत्त मंदिरासाठी 2 कोटी रुपये खर्चाच्या निधीस राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मंजूरी देण्यात आली असून पहिल्या टप्यात 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि याच कुशीत विहंगम वेदगंगा नदी किनारी ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री. दत्त मंदिर यामुळे शेणगावची महती दिवसेंदिवस वाढत आहे. श्री दत्तभक्त संप्रदायाचे सर्व संकेत पूर्ण करणाऱ्या व अतिशय प्राचीन असणाऱ्या श्रीक्षेत्र शेणगाव येथील श्री दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव शेणगावच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा आहे.
श्री क्षेत्र शेणगावच्या श्री दत्त देवस्थानचा लौकिक दिवसेंदिवस वाढत असून येथील विविध विकास कामे करणे गरजेचे होते. याकरीता येथील विविध विकास कामांना निधी मिळावा याकरीता प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 13 जुन, 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्यातील कामांकरीता 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगितले आहे.
या निधीमधून भक्तानिवास व पुरष शौचालय बांधकाम, कंपाऊंड वॉल, पेव्हींग ब्लॉक, पोहोच रस्ता, भक्तनिवास व शौचालय विद्युतीकरण, घनकचरा व्यवस्थापन आदी कामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांसाठी निधी मिळावा पाठपुरावा करण्यात आला असून याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.