31 हजाराची लाच घेताना पुण्यातील वैद्यमापन शास्त्र विभागातील सह नियंत्रक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

इस्लामपूर वैद्यमापन शास्त्र विभागातील निरीक्षकाकडून 31 हजार रुपये लाच स्वीकारताना पुण्यातील वैद्यमापन शास्त्र विभागातील सह नियंत्रक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. डॉ. ललित बेनीराम हारोळे (वय-55) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि. 31) केली.
इस्लामपूर वैद्यमापन शास्त्र विभागातील निरीक्षक (वय- 54) यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे इस्लामपूर वैद्यमापन शास्त्र विभागात निरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. तर डॉ. ललित हारोळे हे तक्रारदार यांचे विभागीय प्रमुख आहेत. तक्रारदार यांच्या हद्दीत होणारी पडताळणी (Verification) व मुद्रांकण च्या (Stamping) बद्दल दरमहा 4 हजार रूपये हप्ता प्रत्येक निरीक्षक विभाग प्रमाणे मागणी केली.
तक्रारदार यांचे कडील 1 नियमीत व 3 अतिरिक्त कार्यभार असे 16 हजार रूपये व डायमंड शुगर वर्क कंपनीचे स्टोअर कॅलिब्रेशन तीन टॅकसाठी प्रत्येकी 5 प्रमाणे 15000 असे एकूण 31हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता डॉ. ललित हारोळे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 31 हजार रुपये लाच घेताना डॉ. ललित हारोळे यांना रंगेहाथ पकडले.डॉ. ललित यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर , नितीन जाधव ,
सहायक पोलीस उपनिरीक्षक मुकूंद आयाचीत
पोलीस अंमलदार रियाज शेख यांच्या पथकाने केली.