लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात ‘ईडी’ कडून मोठी कारवाई , कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) मोठी कारवाई केली आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याच्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. ‘ईडी’ने लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, ही संपत्ती पाटणा आणि गाजियाबाद येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ईडी’ने जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात एजन्सीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. यापूर्वी ईडीने लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह काही नातेवाईकांची चौकशी केली हाेती.
काँग्रेस नेतृत्त्वाखालील संयुक्त पुराेगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ( २००४-२००९ ) लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री हाेते. या काळात जमीन घेवून काहींना रेल्वेमध्ये नाेकरी दिल्याचा आराेप त्यांच्यावर आहे. याच काळातभारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप-डी पदांवर व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. संबंधित व्यक्तींकडून लालू प्रसाद यादव यांनी जमीन हस्तांतरीत केल्याचा आरोप ईडी आणि सीबीआयने केला आहे.