5000 रुपये लाच स्वीकारताना हेड कॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यसाठी आणि अटक न करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन 5 हजार रुपये लाच स्वीकारताना कन्नड तालुक्यातील देगाव (रंगारी) पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुरेश देवराव शिंदे (वय-38) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीने ही कारवाई सोमवारी (दि.31) केली.
याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे त्यांच्या मोठ्या भावाशी व भावजयीशी घरगुती वाद झाले आहेत. त्या वादामध्ये तक्रारदार यांच्यावर आयपीसी 323, 324, 506, 427 प्रमाणे देगाव (रंगारी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी तसेच वाढीव कलम न लावण्यासाठी हेड कॉन्स्टेबल सुरेश शिंदे यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 5 हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी 28 जुलै रोजी औरंगाबाद एसीबी कार्यालयात हेड कॉन्स्टेबल सुरेश शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता शिंदे यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 5 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये लाच घेताना सुरेश शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर देगाव (रंगारी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे , अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक हनुमंत वारे पोलीस अंमलदार दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.