आमचे दैवत शरद पवारसाहेब हेच आमचे नेते , राष्ट्रवादीचे कुटूंब एकसंघ राहील : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

‘राष्ट्रवादी’ हे एक आमचे कुटुंब आहे. कदाचित; आमच्यामध्ये कांही कारणाने मतभेद झाले असतीलही. पण; अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो, “नजीकच्या काळात हे कुटुंब एकसंघ झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे दैवत शरद पवारसाहेब हेच आमचे नेते आहेत आणि राहतील.”
मूरगूड ता. कागल येथे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा शहर राष्ट्रवादीतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मंत्री श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जनतेने ४० वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यामुळेच; मी पाचवेळा आमदार आणि आठवेळा मंत्री झालो. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी सातत्याने श्रम करीत राहीन. स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांचा संयम आणि स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक यांचा आक्रमकपणा हे दोन्हीही गुण स्वीकारले आणि या गुणांवर वाट चालत राहिलो, असेही ते म्हणाले.
माजी आमदार के. पी. पाटील, युवराजबापू पाटील, गणपतराव फराकटे, पंडितराव केणे, शामराव पाटील- यमगेकर, सौ. सुहासिनीदेवी पाटील, सौ. शीतल फराकटे, धनाजीराव देसाई, प्रवीणसिंह भोसले, शशिकांत खोत, मनोजभाऊ फराकटे, रवींद्र पाटील -बानगेकर, ॲड. जीवनराव शिंदे, जयदीप पोवार, विकास पाटील, दत्ता पाटील -केनवडेकर, विजय काळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकारी, यशस्वी विद्यार्थी, खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मी मुश्रीफ साहेबांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात त्यांच्यासोबत असतो. त्यांच्यामुळेच मला राजकीय जीवनातील अनेक संधी मिळत गेल्या. गोरगरीब जनतेच्या हृदयातील आशीर्वाद हसन मुश्रीफ यांना अखंड यशस्वी करणार आहेत.
प्रवीणसिंह पाटील म्हणाले, शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ करता येते काय? हे मुश्रीफ साहेबांनी लक्ष घालून बघावे. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादावर पुढचे आमदारदेखील हसन मुश्रीफच असतील.
भैय्या माने, शितल फराकटे, विजय काळे, दिग्विजय पाटील, अवचितवाडीच्या सरपंच सौ. वेदिका संभाजी गायकवाड यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, सौ. सुहासिनीदेवी पाटील, प्रताप उर्फ भैया माने, सूर्यकांत पाटील, शशिकांत खोत, ॲड. जीवनराव शिंदे, विकास पाटील, मनोज फराकटे, धनाजीराव देसाई, उमेश भोईटे, प्रवीणसिंह भोसले, देवानंद पाटील, शामराव पाटील, रंगराव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत ॲड. सुधीर सावर्डेकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. आभार सम्राट म्हसवेकर यांनी मानले.
नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी शेरोशायरी म्हंटली……
उमर थका नही सकती,
ठोकरे गिरा नही सकती,
अगर जिद्द हो जितने की,
तो हार भी हरा नही सकती….. !हार गये मुझे हरानेवाले,
क्योंकी, उनके पास मुझे गिराने का साजिश था,
और मुझमें…..,
खडा होने का जज्बा था …..!दाखवून देवू……….
कोल्हापुरात शेंडा पार्कमधील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय एक हजार बेडचे, सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज असे महाविद्यालय उभे करु. ज्यामुळे कोल्हापूरचा लौकीक वाढेलच. त्याबरोबर कोल्हापूर देशाला दाखवून देईल की वैद्यकीय महाविद्यालय कसे असते, असे काम करु.आठवा अवतार……..
प्रचंड कामाच्या आणि गोरगरीब जनतेच्या आशीर्वादावर हसन मुश्रीफ सहावेळा आमदार आणि मंत्रीही झाले. आतापर्यंत त्यांचे सात अवतार आपण पाहिलेत. आता त्यांनी मंत्रिपदाची आठव्यांदा शपथ घेतलेली आहे. आठवा अवतार श्रीकृष्णाचा होता. त्यामुळे या वर्षभरात काय चुणूक दाखवतात, हे पहावेच लागेल, असे के. पी. पाटील म्हणाले.