कागल बस स्थानकाजवळ भराव्याच्या डबल बोगद्याऐवजी पिलरचा उड्डाणपूल बांधा ,कागल -सातारा सहापदरीकरणाच्या कामातील त्रुटी दूर करा ; कागल शहर कृती समितीची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाने मागणी

कागल प्रतिनिधी :विजय मोरबाळे
कागल -सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाच्या कामामध्ये कागल बस स्थानकाजवळ भराव्याच्या डबल बोगद्याऐवजी पिलरचा उड्डाणपूल बांधा. सहापदरीकरणाच्या कामामधील त्रुटी दूर करा. अन्यथा; कागल शहर कृती समितीच्यावतीने रास्ता रोको, उपोषणे आणि अधिकाऱ्यांना घेराव आंदोलने करावी लागतील, असा इशारा समितीने दिला आहे.
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, कागल शहर राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक कागलमध्ये झाली. कृती समितीने मंत्री श्री. मुश्रीफ यांना निवेदन दिले. यामध्ये सहा पदरीकरणाच्या कामातील त्रुटींचा उल्लेख आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी माझ्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व कृती समितीने प्रस्तावित महामार्ग कामाची पाहणी केली होती. त्यावेळी इतर मागण्यांबरोबरच बस स्थानकाजवळ भराव्याच्या डबल बोगद्याऐवजी पिलर उभारून उड्डाणपूल बांधकामाची आग्रही मागणी केली होती. ती मान्यही केली होती.
कृती समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, बस स्थानकाजवळ भराव्याच्या डबल बोगद्याऐवजी पिलरचा उड्डाणपूल ही आमची मुख्य मागणी आहे. ती मान्य न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत महामार्गाचे काम होऊ देणार नाही. नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन उभारू.
निवेदनात म्हटले आहे, कृती समितीने मागणी केलेल्यापैकी लक्ष्मी टेकडी येथील फ्लायओव्हर करणे, एस. टी. डेपोसमोर बोगदा (टनेल) बांधणे, मुरगुड नाका येथे फ्लायओव्हर करणे, सर्व्हीस रोड रुंदीकरण, ड्रेनेज व्यवस्था आदी कामे समाविष्ट केल्याचे आम्हाला कळविण्यात आले आहे.
दरम्यान; महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कृती समितीने सुचवलेल्या काही मागण्या अंशतः पूर्ण झाल्या आहेत. कागल बस स्थानकाजवळचा सिंगल बोगदा डबल बोगदा करण्याची योजना आहे. परंतु; तो भराव्याऐवजी पिल्लर उभारून उड्डाणपूल करावा, ही महत्त्वाची मुख्य मागणी आहे.
कागल बस स्थानकाजवळ भराव्याच्या डबल बोगद्याऐवजी पिलरचा उड्डाणपूल झाल्यास……….
वाहतुकीची कोंडी होणार नाही.
बस स्थानक परिसरात नव्याने भूसंपादन करावे लागणार नाही.
त्यामुळे महामार्गालगतचे रहिवाशी, हातगाडीवाले, फळविक्रेते, चहा टपरीवाले व छोटे व्यावसायिक विस्थापित होणार नाहीत.
कर्नाटकातून येणारी वाहने, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतीमधून कागलमधील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूक सुरळीत होईल.
स्थानिक बस वाहतूक, रिक्षा व वडाप ही वाहतूकसुद्धा सुरळीत होईल व अपघात टळतील.
निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने, उपाध्यक्ष चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नितीन दिंडे, अजित कांबळे, संजय चितारी, अस्लम मुजावर, आशाकाकी माने, सुनील माळी, संजय ठाणेकर, प्रवीण काळबर, सौ. अंजुम मुजावर, सतीश घाडगे, शोभा लाड, विवेक लोटे, इरफान मुजावर, सतीश पोवार, तौफिक नगारजी, अमर बारड, संतोष बारड, दिलीप बारड, युवराज बारड, बाबुराव करंजे, शशिकांत माळी, जितेंद्र पटेल, धनाजी माळी, धीरज पटेल, सचिन बारड, रईस पठाण, सलीम नायकवडी, जमीर जमादार, वैभव मगदूम, तेजस माळी,अभिजीत हुल्ले, विजय चव्हाण, संतोष पोळ, संतोष घोरपडे यांच्या सह्या आहेत.