धक्कादायक : नागपूर येथे ऑनलाइन गेमच्या नादात ५८ कोटी गमावले

नागपूर येथील घटना ऑनलाइन गेमच्या नादात अडकून एका व्यापाऱ्याने तब्बल 58 कोटी रुपये गमावल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. फिर्यादी नागपूर शहरातील मोठे व्यापारी आहेत. 58 कोटी रुपये गमावल्यानंतर त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल होताच गोंदिया येथे राहात असलेल्या आरोपीच्या घरावर धाड टाकली असता घरातून पोलिसांनी आत्तापर्यंत अंदाजे 4 किलो सोनं आणि 10 कोटींची रोकड जप्त केली आहे. मात्र, आरोपी पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणातील तक्रादाराने सायबर पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला की आरोपी अनंत उर्फ सोन्दू नवरतन जैन याने ऑनलाईन गेमिंग अॅपवर 24 तास बेटींग करून करोडो रूपये कमावता येतील असे प्रलोभन दिले. तक्रारदार यांना कमी कालावधीत फार जास्त पैसे कमावण्याचे लालच देवून आरोपीने त्यांना ऑनलाईन बेटींग/गेमिंग लिंकचे युझरनेम, पासवर्ड पाठवून त्यावर दिलेले पॉईंट परत होणार नाहीत, असे बोलून बेटींग करण्यासाठी मजबूर केले. आरोपी अनंत उर्फ सोन्टू याने तक्रारदार यांना ऑनलाईन लिंकवर बेटींग करण्याची सवय लावली. तक्रारदार हे त्यांचे पैसे रिकव्हर करण्यासाठी त्यांच्या मित्रांकडून उधार पैसे घेवून आरोपीच्या सांगण्यावरून बेटींग करीत होते. परंतु, फिर्यादीला कधीही फायदा झाला नाही.
ऑनलाईन बेटींगमध्ये फक्त आरोपीलाच फायदा होत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने आत्तापर्यंत गमावलेले पैसे आरोपीकडे परत मागितले, तेव्हा आरोपीने तक्रारदार यांना जीवे मारण्याची धमकी देवून उलट 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. अखेर सर्व पर्याय संपल्यानंतर फिर्यादीने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. आरापींनी लिंकमध्ये सेटींग आणि मॅन्युपुलेशन करून फिर्यादीला बनावट ऑनलाईन लिंकमध्ये खेळण्यास भाग पाडूान तब्बल 58 कोटी 42 लाख 16 हजार 300 रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादीचे जवळील सर्व बचत गेमच्या नादात गमावली आहे. एवढंच नाही तर मित्र आणि नातेवाईकांकडूनही कोट्यावधी रूपायांचे कर्ज घेतले आहे. फिर्यादीचे आरोपींविरूध्द दिलेल्या रिपोर्टवरून सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा तपास चालू आहे.