संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची पेन्शन पोस्टल बँकद्वारा घरोघरी पाठवण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन ; पावसाळी अधिवेशनात विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची पेन्शन पोस्टल बँकद्वारा घरोघरी पाठवण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देणारी माहिती त्यांनी दिली. तसेच; ही पेन्शन दरमहा एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपये इतकी वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान; यापूर्वी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मिळणाऱ्या विधवा मातांच्या मुलांची वये २५ वर्षे झाल्यानंतर ती पेन्शन बंद होत होती. ही अट रद्द केली आहे. त्या मुलांना सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरी लागून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईपर्यंत पेन्शन चालूच ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
तसेच, दिव्यांग लाभार्थ्यांच्या उत्पन्न मर्यादेची अट ५० हजार रुपये आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणेच या योजनेसाठी जेष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने करू, मुलांच्या वयोमर्यादेच्या अटीमुळे बंद झालेल्या पेन्शनची माहिती घेऊन त्या शासन नियमाप्रमाणे कागदपत्रे पुरवठा केल्यानंतर नव्याने सुरू करू आणि सरसकट ५० हजार उत्पन्न मर्यादाबाबत शासन गांभीर्याने विचार करेल, असेही ते म्हणाले.