कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस ; पंचगंगा नदी प्रथमच पात्राबाहेर , 51 बंधारे पाण्याखाली, कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद ?

कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर दमदार हजेरी लावली. त्यामुळे मोसमात प्रथमच पंचगंगा नदी बुधवारी रात्रीच्या अकराच्या सुमारास पात्राबाहेर पडली. पंचगंगेची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील जांबरे हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे जिल्ह्यातील 15 पैकी 3 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी धरणात 62.61 टक्के साठा झाला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात 1200 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काळम्मावाडी धरणामध्ये 29.47 टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने ओढे, नाल्यांसह ओहळ भरुन वाहत आहेत. पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 122 जिल्हा आणि 24 राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा व दोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने शेतीच्या कामांनी पुन्हा एकदा वेग घेतला आहे.
कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?
कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध नद्यांवरील 51 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण
हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी
घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर
वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली.
कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली
वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी
कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे
धामणी नदी : सुळे
तुळशी नदी : बीड
अतिवृष्टीमुळे कोण मार्ग बंद आणि पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु?
करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद,
आंबेवाडी, चिखली वाहतूक सुरु चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद, कुरणी, गवसे, अडकूर मार्गे वाहतूक सुरु
आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, ही वाहतूक बाचणी, पेरनोळी मार्गे सुरु
शिरोळ तालुक्यात शिरोळ बंधाऱ्यावर पाणी आल्याने शिरोळ, कुरुंदवाड या मार्गावरुन वाहतूक सुरु गगनबावडा येथील मोरीवर पाणी आल्याने रस्ता बंद, पर्यायी मार्ग नाही.