ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदमापूर : अमावस्या निमित्त आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास ; वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का?

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालयाच्या दि.17 (सोमवार) अमावस्या यात्रेवेळी सुमारे पाच ते सहा तास वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालयाच्या अमावस्या यात्रेवेळी वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला भक्तांना सामोरे जावे लागत असताना सुद्धा प्रशासनाच्या वतीने कोणतीही दखल अथवा उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का? पोलीस यंत्रणा सतर्क होणार का असा संतप्त सवाल केला जात आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालयाच्या दि.17 (सोमवार) अमावस्या यात्रेवेळी सुमारे पाच ते सहा तास वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलीस प्रशासन व देवस्थान समिती विरोधात भाविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे.काल भाविकांच्या मोठ्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा दिसून आल्या. यामुळे कूर ते मुदाळतिट्टा आणि ते मुदाळतिट्टा मार्गावर वाहतूक ठप्प झाली.

आदमापूर येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला तसेच मुदाळतिट्टा ते निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो. येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूकच करता येत नाही यामुळे या कोंडीचा सामना भाविकांना करावा लागतो. मंदिराजवळ वाहनतळ असताना देखील केवळ घरी दर्शन झाल्यावर जायचं आहे या भक्तांच्या भावनेमुळे सर्वांनाच त्रास होतो.

राधानगरी निपाणी रस्ता नव्यानेच करण्यात आला आहे हा रस्ता करत असताना मुदाळतिट्टा ते निढोरी या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे होते. पण रुंदीकरण ऐवजी रस्ता अरुंदच झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या गटारावर उंचवटा निर्माण केल्याने वाहने उभी करण्यासाठी मिळत असलेली दोन फूट जागा पुन्हा कमीच झाली आहे. याचा फटका वाहतुकीला होत आहे. येथे होणाऱ्या वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रशासना समोर उभा आहे. पण हा रस्ता नव्याने होत असताना संबंधित अधिकारी वर्गाच्या ही गोष्ट लक्षात न येणे ही आश्चर्यजनक बाब असल्याचे भाविक बोलत आहेत. भविष्यात येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असणार असल्यामुळे पुन्हा याच समस्येला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.

पाच ते सहा तास झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविकांसह बाहेरगावी उद्योग व्यवसाय नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवासी व बिद्री गारगोटी मुरगुड सरवडे मुदाळ येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसला. पूर्वी गारगोटी पोलीस ठाण्याहून वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत होता. पण सध्या यामध्ये थोडी कमतरता असल्याचे दिसून येत आहे. देवस्थान समिती यावर कोणती उपाययोजना करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या वाहतुकीच्या कोंडी दरम्यान संततधार पाऊस सुरू झाल्याने भक्तांचे हाल झाले.

प्रशस्त पार्किंगची गरज…

देवस्थान समितीच्या वतीने सध्या असलेली पार्किंग व्यवस्था ही अपुरी आहे त्यामुळे भविष्यात भाविकांना आपली वाहने पार्क करता येतील यासाठी मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रशस्त पार्किंग व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध करणे हेच ध्येय देवस्थान समितीला समोर ठेवावे लागणार आहे. सध्या आदमापूर मुदाळ परिसरात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जागा खरेदी करणे व मिळवणे हा मोठा प्रश्नच निर्माण होणार आहे. काही ठिकाणी खासगी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे पण तेथे वाहने पोहोचणे कठीण होत असल्याने ती रिकामीच राहतात.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks