दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करण्यात यावी आणि गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह गोविंद मंडळांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी येथे भेट घेऊन निवेदन दिले.
दहीहंडी खेळाला साहसी दर्जा देण्यात आला आहे. याबाबत सरकारमार्फत उपाययोजना झालेली नाही तरी साहसी खेळासाठी पुढाकार घेऊन सरकार व दहीहंडी पथकांमध्ये समन्वय साधून या खेळासाठी स्पर्धा आयोजित करण्यात यावी. आयोजकांवर ज्या जाचक अटी लादण्यात आल्या आहेत त्या शिथील कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.