कोल्हापूर चित्रनगरीतील चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयी-सुविधा उभारणी तातडीने करा ; मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी लागणाऱ्या अद्ययावत सोयी -सुविधांची निर्मिती व त्यासाठीच्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करा, अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुंबईत मलबार हिल येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही महत्त्वाची बैठक झाली.
या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान विकास खारगे, उपसचिव विलास थोरात व श्रीमती विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, कलादिग्दर्शक संतोष फुटाणे, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, वास्तु विशारद इंद्रजीत नागेशकर, कोल्हापूर चित्रनगरीचे अधिकारी आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये हिंदी व मराठी दूरदर्शन मालिकासह चित्रपटांच्या चित्रीकरणांमध्ये वाढ होऊन महामंडळाच्या महसुलामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सोळा कामे हाती घेतलेली आहेत. या कामांच्या निविदा पुढच्या महिन्यात निघून मे महीन्याअखेर ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून होत असलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण झाले. ४५ कोटी निधीतून होणाऱ्या या कामांमध्ये चित्रीकरणासाठी नवीन बंगला, तीन वस्तीगृहे, अद्ययावत रेल्वेस्थानक व दोन नवीन स्टुडिओ या चित्रीकरण स्थळांचा समावेश आहे. तसे टॉक शोसाठी ध्वनी व अग्निशामक योजना उभारणे, अंतर्गत रस्ते व पथदिवे बसविणे, राष्ट्रीय महामार्गालगतच्या भूखंडाला संरक्षण भिंत बांधकाम, एमआयडीसी कडून पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे, सबस्टेशनपासून विविध चित्रीकरणाच्या स्थळापर्यंत वीजपुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक केबल टाकणे, चित्रीकरणाकरीता चाळीचे बांधकाम, तंत्रज्ञान व सहकालाकारांसाठी २० खोल्यांचे वस्तीगृह, मंदिराचे बांधकाम व वाड्याचे नव्याने बांधकाम अशा कामांचा समावेश आहे.