कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकाचा मृत्यू

नेबापूर (ता. पन्हाळा) येथे तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना नेबापूर हद्दीतील जगताप शेत येथे आज (दि.२९ जून) सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये आई नंदा गुंगा मगदूम आणि मुलगा अजिंक्य गुंगा मगदूम या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारपेठ (पन्हाळा) येथील अजय गुंगा मगदूम (वय-३३ वर्षे) यांचे जामदडकी नावाचे शेत नेबापूर हद्दीत आहे. दररोज अजय हा शेतीच्या कामासाठी सकाळी सात वाजता शेताकडे येत असे. नेहमीप्रमाणे आजही अजय शेतात आला होता.
दरम्यान शेतातील मशागत आटोपून तासभरात परत येणारा अजय तास होऊन गेला तरी घरी आला नाही, हे आई नंदा यांच्या लक्षात आले. त्यांनी अजयला फोन लावला तरी त्याने फोन उचलत नसल्याने अजयची आई नंदा मगदूम या (वय- ४९ वर्षे) अजय का आला नाही हे पाहण्यासाठी शेतात गेल्या. तेव्हा त्यांना अजय शेतात खाली पडलेल्या अवस्थेत दिसला. हे पाहिल्यानंतर नंदा यांनी आरडाओरडा केली. त्यानंतर त्या अजयला उचलण्यासाठी गेल्या असता, त्यादेखील अजयच्या शेजारी पडल्याचे दिसले.