गडहिंग्लजमधील सांस्कृतिक केंद्र, वडरगे रोडवरील क्रीडा संकुलासाठी निधी देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक : राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गडहिंग्लज मधील सांस्कृतिक केंद्र, वाचनालय व वडरगे रोड वरील क्रीडा संकुलाचे बांधकाम या करिता एकूण रू १७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करा. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.हा निधी देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक असलेची माहिती श्री घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या शहर अंतिम विकास योजना आराखड्यामध्ये सांस्कृतिक केंद्र व वाचनालय करिता क्षेत्र १.०५ हे. आर. आरक्षीत आहे.सध्या ही जमीन नगरपरिषदेच्या ताब्यात आहे.
आजरा, चंदगड व गडहिंग्लज या विभागास सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. या परिसरातील कलावंताना सांस्कृतिक हॉल किंवा नाटयगृहाची सोय नाही. सदर ठिकाणी सांस्कृतिक केंद्र व वाचनालय बांधकाम करणे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने अतिक्रमण विरहीत आरक्षीत जागेवर सांस्कृतिक केंद्र व वाचनालयाचे अंदाजपत्रक व नकाशेही तयार आहेत. त्यासाठी सुमारे 15 कोटी निधीची आवश्यकता आहे.
तसेच , गडहिंग्लज नगरपरिषदेच्या मालकीची वडरगे रोड येथे जागा उपलब्ध आहे. या जागेवर कीडा संकुल उभा करणे प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या बांधकामाकरिता सध्या १ कोटी इतका निधी मंजूर आहे. सदरचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेमार्फत चालु आहे. उर्वरित कामाकरिता अपेक्षित आणखी रू. २ कोटी रक्कमेची मागणी श्री घाटगे यांनी केली आहे.
या दोन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधान सचिवांना याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.