बिद्री साखर कारखाना निवडणूक : सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर , ३ जुलैला पुढील सुनावणी

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी काल मंगळवारी उच्च न्यायालयात झाली. आज झालेल्या सुनावणीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटाचे तसेच सरकारचे वकील यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले. परंतु संध्याकाळी वेळेत युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली. आता उर्वरित सुनावणी येत्या सोमवारी दि.३ जुलै रोजी होणार आहे.
बिद्री साखर कारखान्याची निवडणूक पावसाळ्यानंतर म्हणजे ३० सप्टेंबर नंतर घेण्याचा शासकीय आदेश कार्यासन अधिकारी अनिल चौधरी २ जून रोजी प्रसिद्ध केला होता. या आदेशाविरोधात सत्ताधारी गटाच्या वतीने उच्च न्यायालयात ५ जून रोजी याचिका दाखल करण्यात आली. यावर ७ जून रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी शासनाची बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. यावर न्यायालयाने २१ जूनला पुढील सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वेळ अपूरा राहिल्याने पुन्हा २२ जूनला सुनावणी घेण्यात आली. परंतु यावेळी विरोधी गटाचे वकील अनुपस्थित राहिल्याने आज मंगळवारी दि. २७ रोजी घेण्याचे निश्चित केले.
काल झालेल्या सुनावणीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. या याचिकेत राज्य शासनालाही प्रतिवादी करण्यात आल्याने सरकारचे वकीलांनीही आपले म्हणणे मांडले. दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही सुनावणी सुरु होती. परंतू न्यायालयाची वेळ संपल्याने आजची सुनावणी थांबविण्यात आली. आता यावर येत्या सोमवारी दि. ३ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असून यावेळी न्यायालय निर्णय देणार की पुन्हा पुढील तारीख मिळणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.