मोठी बातमी : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना शिवडी कोर्टाचे समन्स ; 14 जुलैला हजर राहण्याचे आदेश

मुंबईतील शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.
29 डिसेंबर 2022 रोजी सामना मुखपत्राच्या प्रकाशित एका लेखात खासदार शेवाळे यांचे दुबई, पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळेंनी वकील चित्रा साळुंखे यांच्या मार्फत 3 जानेवारी 2023 रोजी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचे सामनाकडून प्रत्युत्तरात सांगण्यात आले.
या उत्तरानंतर शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला. दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळेंनी सादर केला.