राधानगरीसह धरण स्थळ जिल्ह्यातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हेच ध्येय : राजे समरजितसिंह घाटगे ; हजारो शाहूभक्तांच्या गर्दीच्या साक्षीने उत्साही वातावरणात शाहू जयंती सोहळा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येत्या पाच वर्षात राधानगरीसह धरण स्थळ जिल्ह्यातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हेच ध्येय आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अथांग कार्याचे प्रतिक असलेल्या धरणस्थळी त्यांच्या १४९व्या जयंतीवेळी ते बोलत होते. यावेळी युवराज घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, राधानगरीकरांच्या त्यागातून ऐतिहासिक धरणाची निर्मिती झाली. त्यामुळे संपूर्ण जिल्हा सुजलाम- सुफलाम झाला. या त्यागाची परतफेड या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करून करूया. येत्या काळात शाहूप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागातून शाहू जयंती यापेक्षा मोठ्या प्रमाणात साजरी करूया. त्या माध्यमातून राजर्षींचे कार्य व विचार आजच्या पिढीसमोर येतील व ते त्यांना प्रेरणादायी ठरतील.
धरणातील जलपूजन करून वाद्यांच्या गजरात बारा बलुतेदारांच्या सोबत त्यांनी जलकलश जयंतीस्थळापर्यंत आणले. त्यांच्यासह युवराज आर्यवीर घाटगे व राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास विधीवत जलाभिषेक घातला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांनी केले.हजारो शाहूभक्तांच्या गर्दीच्या साक्षीने उत्साही वातावरणात हा जयंती सोहळा साजरा झाला. स्वागत संभाजी आरडे यांनी केले.