आषाढी यात्रेच्या निमित्ताने १७ लाख वारक-यांची तपासणी होणार : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारक-यांची आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी पंढरपूरमध्ये राज्य सरकारच्या वतीने तीन ठिकाणी मेगा कॅम्प घेतले जाणार आहेत. त्यामध्ये साधारण: 17 लाख वारक-यांची तपासणी होईल, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला. आज डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या अधिका-यांसोबत बैठक घेऊन या तीनही आरोग्य शिबिराच्या उभारणीची पाहणी केली.
राज्यभरातून शेकडो किलिमीटर पायी चालत जवळपास ४६३ दिंड्या पंढरपूरकडे निम्म्यापेक्षा जास्त अंतर कापत पुढे वाट चालत आहेत. यंदा ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या संकल्पनेमुळे आतापर्यंत सव्वा तीन लाख वारक-यांची तपासणी पूर्ण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे आहे. या सर्व दिंड्या पंढरपूरला पोचेपर्यंत पाच लाख भाविकांची तपासणी आणि उपचार झालेले असतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. या प्रत्येक दिंड्यासोबत १०८ ची ऍम्ब्युलन्स आणि सुसज्ज वैद्यकीय पथके असल्याने भाविकांना तात्काळ वैद्यकीय उपचार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.