जिल्हा बँकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कॅशियर, क्लार्क, शिपाई व ड्रायव्हर पदांवर होणार कंत्राटी नेमणुका ; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
जिल्हा बँकेत गेल्या १५ वर्षात नवीन नोकर भरती झालेली नाही. सेवानिवृत्त होत चाललेल्या कर्मचाऱ्यांमुळे कर्मचारी संख्या अपुरी पडून कामकाजावर ताण पडून ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. यावर पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कॅशिअर, क्लार्क, शिपाई व ड्रायव्हर या पदांवर सहकार खात्याच्या मान्यतेने ११ महिन्यांच्या मुदतीने कंत्राटी नोकर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, यापूर्वी बँकेने १५ वर्षांपूर्वी २००७ मध्ये नोकर भरती केली होती. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरतीशिवाय भरती झालेली नाही. दरवर्षी ६५ ते ७० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे बँकेकडे आजमीतिला एकूण १,२४६ कर्मचारी कार्यरत आहेत. साहजिकच अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे केंद्र कार्यालयासह जिल्हाभर १९१ शाखा असलेल्या बँकेच्या कामकाजावर ताण पडून ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे.
यावर पर्याय म्हणून बँकेने राज्य सरकारच्या सहकार विभागाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला सहकार विभागाने अटी व शर्तीनुसार मान्यता दिली आहे.
सेवकमांडनुसार बँकेकडे एकूण ३८६ जागा रिक्त आहेत. त्यानुसार बँकेने जाहिरात प्रसिद्ध करून कॅशियर, क्लार्क, शिपाई व ड्रायव्हर या पदांसाठी बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवले होते. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत एकूण दोनशे अर्ज आले आहेत. त्यामधून वयाच्या ६५ वर्षांखालील व सेवाकाळात कारवाई न झालेल्या कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना कॅशियर, क्लार्क, शिपाई व ड्रायव्हर या पदांवर येत्या एक जुलै २०२३ पासून ११ महिन्यांच्या मुदतीने सहकार आयुक्तांच्या अटी व शर्तीनुसार नेमणूका करण्याचे ठरले आहे.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, आमदार डॉ. विनय कोरे, खासदार प्रा. संजयदादा मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.
यावेळी प्रशासन विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे, कायदा व सल्ला विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, अकाउंट बँकिंग विभागाचे व्यवस्थापक ए. एस. वाळकी, शेती कर्जे विभागाचे व्यवस्थापक शिवाजीराव आडनाईक, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक गिरीश पाटील, व्यवसाय विकास विभागाचे व्यवस्थापक एस. ए. वरुटे, मार्केटिंग प्रोसेसिंगचे व्यवस्थापक ए. के. मुजावर, ऑडिटचे व्यवस्थापक सुनील लाड आदी अधिकारी उपस्थित होते