उत्तूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांचे आज “शासन आपल्या दारी” अभियान , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा उपक्रम ; उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील २३ गावातील नागरिकांना लाभ घेण्याचे केले आवाहन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
उत्तूर ता. आजरा येथे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज शनिवारी दि. २४ रोजी “शासन आपल्या दारी” या अभियानाचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान होत आहे. गावाच्या पूर्वेकडील श्री. महादेव मंदिरात सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणाऱ्या या अभियानात उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील २२ गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे यांनी केले. या अभियानात उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील उत्तूरसह एकूण २३ गावांमधील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यासाठी योजना निहाय २२ स्वतंत्र कक्ष तयार केले आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, मारुतराव घोरपडे, दीपकदादा देसाई, महादेवराव पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या अभियानात नवीन आधार कार्ड काढणे व दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे व नाव वाढविणे, जीर्ण व खराब शिधापत्रिका बदलणे, सामाजिक विशेष सहाय्य योजना, विधवा, दीर्घकालीन आजार व दिव्यांगासाठीच्या योजना, श्रावणबाळ व राज्यनिवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, बेरोजगार तरुणांचे बायोडाटा तयार करणे, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी एसटी पास, घरगुती नवीन वीज कनेक्शन, कोविड प्रतिबंधक लसीकरण, नवीन मतदार नोंदणी, नवीन शिधापत्रिका अर्ज, उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, प्रधानमंत्री उज्वला २.० योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन फॉर्म भरणे, दिव्यांगासाठी युडीआयडी कार्ड नोंदणी, शहरी पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, दिव्यांगासाठी उदरनिर्वाह भत्ता, गायरान अतिक्रमण नियमानुकुल करणे, आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जनआरोग्य कार्ड काढणे, कोणत्याही शासकीय कार्यालयात दिलेले प्रलंबित अर्ज गोळा करणे या सेवा -सुविधा पुरविल्या जाणार आहेत.