लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून 9 तरुणांची 29 लाखाची फसवणूक

लष्करी गणवेश घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे सांगून ९ तरुणांना लष्करात भरती करतो, असे सांगून २८ लाख ८८ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे, धुळे, औरंगाबाद, सातारा येथील तरुण यात फसले आहेत.
याबाबत कोंढवा पोलिसांनी प्रमोद भिमराव यादव (वय २७, रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका २९ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६३७/२३) दिली आहे. हा प्रकार सप्टेबर २०२२ ते १८ जून २०२३ दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद यादव हा लष्कराचा गणवेश घालून लोकांना आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगत.
माझी मोठ्या अधिकार्यांशी ओळख आहे. असे सांगून लोकांना आर्मीमध्ये भरती करतो, असे आमिष दाखवित असत.फिर्यादी तसेच सातारा, धुळे,औरंगाबाद येथील तरुणांना त्याने भरती करतो,असे सांगून त्यांच्याकडून २८ लाख ८८ हजार रुपये उकळले.एक वर्षाहून अधिक काळ झाला तरी भरती न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. यादव याने आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता असून सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.