कोल्हापुरात यावर्षीपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार

कोल्हापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी मान्यता दिली. त्याचे पत्र संस्थेला नुकतेच प्राप्त झाले आहे. यामुळे कोल्हापुरात आता आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विषयाची अभियांत्रिकी पदवी घेता येणार असून यासह कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन व इलेक्ट्रिकल या शाखेचे अभियांत्रिकी अभ्यासक्रम करता येणार आहे
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची सप्टेंबर 2022 मध्ये घोषणा केली होती. त्यानुसार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे विविध प्रक्रिया व आवश्यक त्या पूर्तता करण्यात आल्या. त्यानुसार या महाविद्यालयाला परिषदेने मान्यता पत्र दिले आहे. यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.
येत्या जुलैपासून महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. पाच अभ्यासक्रमांना प्रत्येकी 60 याप्रमाणे एकूण 300 प्रवेश क्षमता आहे. हे महाविद्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे या विद्यापीठाशी संलग्न करण्यात आले आहे.
यावर्षीपासून शासकीय तंत्रनिकेतनच्या जुन्या इमारतीत अभियांत्रिकी महाविद्याल सुरू होणार आहे. दरम्यान, या महाविद्यालयासाठी देण्यात आलेल्या जागेवर येत्या काही महिन्यात प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होणार आहे. याकरिता आर्किटेक्चर नियुक्त करण्यात आला असून बांधकाम आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू आहे. महाविद्यालयासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचार्यांची पदेही मंजूर करण्यात आली आहेत.
या नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाची माहिती देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेत समुपदेशन केंद्र लवकरच सुरू होत आहे. इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्य दत्तात्रय गर्गे यांनी केले आहे.