पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातून 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. कोरोनाचा धोका संपल्याने यंदा वारीमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातून जवळपास 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
25 जून ते 5 जुलै या कालावधीत विशेष गाड्या चालवण्यात येणार असून माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (27 जून रोजी) वाखरी येथे 200 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी एसटीने प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला नेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूप घरी सोडण्याची महत्त्वाची जबाबदारी एसटीची असेल.
‘या’ सहा विभागांतून पाच हजार बसेस –
पुणे – 1200
मुंबई – 500
छत्रपती संभाजीनगर – 1200
नागपूर – 100
नाशिक – 1000
अमरावती – 700
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 24 तास खुले –
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आजपासून (मंगळवार) 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी ही माहिती दिली. दि. 7 जुलैपर्यंत विठोबा-रखुमाईचे दर्शन भाविकांना 24 तास घेता येणार आहे. तसेच आषाढी एकादशी काळात भाविकांना देवाचे दर्शन सुखकर होण्यासाठी, मंदिर समिती आणि प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या आहेत.