वाराणसी येथे झालेल्या खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत मंडलिक महाविद्यालयाच्या दोन मल्लांना सुवर्णपदके

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वाराणसी (उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या तृतीय खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या स्नेहा चौगले हिने ५० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच याच महाविद्यालयाचा मल्ल विजय डोईफोडे यांनेही ८७ किलो वजन गटात सुवर्ण कामगिरी केली. शिवाजी विद्यापीठ महिला व पुरुष कुस्ती संघाने एकूण तीन सुवर्णपदके पटकावली . त्यातील दोन सुवर्णपदके सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या मल्लांनी मिळवून दिली ही उल्लेखनीय बाब आहे.
तसेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अमृता पुजारी हिने ६५ किलो वजन गटात चांदीची गदा पटकावली. तसेच वैष्णवी कुशाप्पा हिने ७६
किलो वजन गटात कांस्यपदक पटकाविले. तर अस्मिता पाटील हिने सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. याचबरोबर कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत श्रावणी शेळके हिने सुवर्णपदक पटकाविले होते. महाविद्यालयाच्या श्रावणी शेळके व नेहा चौगले यांनी मानाची मोपेडही जिंकली आहे.
याबद्दल या सर्व मल्लांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त ॲड. वीरेंद्र मंडलिक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते बुके देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यवाह आण्णासाहेब थोरवत, उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व इतर उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी स्वागत, प्रास्ताविकातून क्रीडा वृत्तांत सांगितला. तसेच आभार डॉ. महादेव कोळी यांनी मानले. या मल्लांना कोच दादा लवटे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांचे मार्गदर्शन लाभले तर खासदार संजय मंडलिक, ॲड. वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासाहेब थोरवत, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले.