काटेवाडी येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले मेंढ्याचे रिंगण पडले पार

जगतगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटपून सकाळी इंदापूरच्या दिशेने रवाना झाला. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे पालखी सोहळा आल्यानंतर पालखीचे स्वागत धोतराच्या पायघड्या अंथरून करण्यात आले. पालखी सोहळा न्याहारीसाठी विसावला होता. त्यानंतर दुपारी काटेवाडी येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचे पहिले मेंढ्याचे रिंगण पार पडले. त्यानंतर पालखी सणसर (ता. इंदापूर) मुक्कामी दाखल झाली, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणंदमध्ये आहे. उद्या माऊलींची पालखी तरडगावकडे मार्गस्थ होणार आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने काटेवाडीत प्रवेश करताच परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. परीट पायघड्या अशी या परंपरेची ओळख आहे. हा सोहळा भाविकांसाठी खूपच विलक्षण असतो. मग सनई-चौघड्यांनी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखीने गावात विसावा घेतला आणि सणसरच्या दिशेने पालखी निघताना काटेवाडीच्या मुख्य चौकात मेंढ्याचे रिंगण पार पडले. हे रिंगण पार पडण्याआधी तुकारामांच्या पालखीला काही बैलांनी रिंगण घातले.
१००० मेंढ्यांचे रिंगण…..
गावात धनगर समाज जास्त प्रमाणात आहे. या समाजातील सगळे लोक आपल्याकडे असणा-या मेंढ्या रिंगणासाठी घेऊन येतात. या सोहळ््यात साधारण १००० मेंढ्या या रिंगणासाठी आणल्या जातात. यंदाही १ हजार मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते.