सांगली हादरली ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची 8 गोळ्या झाडून हत्या ; प्रचंड खळबळ

शनिवारी रात्री सांगली शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. नालसाब मुल्ला असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. एकापाठोपाठ आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली शहर हादरले आहे.
बुलेट गाडीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत एकाच वेळी आठ गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत घटनेची माहिती मिळताच, सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की नालसाब मुल्ला हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र, मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. याआधी त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल होते. परंतु, मागील काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या घराबाहेर बसले असता अज्ञात दोघा हल्लेखोरांनी येऊन मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक असे आठ राऊंड फायर केले. ज्यामध्ये नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले.
त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, सध्या मुल्ला यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली.याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.