पोलिसाच्या थोबाडीत मारल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी अटकेत ; 3 दिवसांची पोलीस कोठडी

गाडी सोडण्यावरून झालेल्या वादात वाहतूक पोलिसाच्या थोबाडीत मारल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी डॉ. वंदना मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरूवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी टोलनाका येथे घडली होती.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी 15 जून रोजी कासुर्डी टोलनाका येथे पोलीस नाईक नितीन कोहम हे वाहतूक व्यवस्थापन करत होते. त्यावेळी त्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्षा असलेल्या डॉ. वंदना मोहिते कारमधून त्या ठिकाणी आल्या. त्यांनी आपली गाडी सोडण्यावरून पोलीस नाईक कोहम यांच्याशी हुज्जत घातली. भडकलेल्या डॉ. वंदना यांनी नुसती हुज्जतच घातली नाही तर कोहम यांना थोबाडीत मारली.
या प्रकारावरून डॉ. वंदना यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे करत आहेत.