भुईबावडा घाटात कोसळली दरड; एकेरी वाहतूक सुरु

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
गगनबावड्यात आठवडाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शनिवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात गगनबावडा पासून एक किलोमीटर अंतरावर दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शनिवारी पहाटे तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली. करूळ घाट मार्ग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्यामुळे बहुतांशी वाहतूक या मार्गातून सुरू आहे. परंतु आता दरड कोसळल्याने या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच भुईबावडा घाटमार्गातून वाहतूक वाढल्याने रिंगेवाडीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे रस्ता अधिकच खचत चालला आहे. या ठिकाणी वेळीच उपाय योजना करावी अन्यथा दुर्घटना घडू शकते, अशी भीती वाहन चालकांमधून व्यक्त केली जात आहे.